‘बाळा भाई का डर नही लगता ? चल हप्ता दे’; पुण्यात गुंडाकडून धमकी देत वसुली

316 0

पुण्यात गुन्हेगारांकडून खंडणी वसूल करण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. असाच प्रकार खडकी भागात घडला. खडकी बाजारातील दुकानदारांना कोयत्याचा धाक दाखवत ‘बाळाभाई का डर नही लगता क्या, चल हप्ता दे’ असं म्हणत गुंडाने खंडणी वसुली केली.

निखील मारुती रामदुर्गेकर ऊर्फ बाळाभाई (वय ३३, रा. मानाजीबाग, बोपोडी) असे या गुंडाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.‌

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना खडकी बाजारमधील मयुर गोयल यांच्या साई जनरल स्टोअर्स या दुकानात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. खडकी बाजार परिसरातील जय कॅफेसमोर एक गुंड हातात कोयता घेऊन लोकांना धमकावुन पैसे काढून घेत होता. याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार पोलीस तिथे पोहोचले असता तोपर्यंत तो गुंड तेथून निघून गेला होता. यावेळी मयुर गोयल यांनी सांगितले की त्यांच्या साई जनरल स्टोअर्स समोर निखील आला आणि पैसे दे म्हणू लागला. त्यावर गोयल यांनी पैसे द्यायला नकार दिला. त्यावर चिडलेल्या निखिलने शर्टच्या आत लपवलेला कोयता बाहेर काढला आणि ‘पैसा निकाल नही तो इधर ही टपकाऊंगा’, अशी धमकी दिली.

त्यावर पुन्हा त्याने गोयल यांना धमकी दिली. ‘तुझे बाळाभाई का डर नही लगता क्या ? क्राऊन चौक में जाके मेरा नाम पुछ, हर कोई हप्ता देता है | तुझको भी देना पडेगा’, असं म्हणत वाद घातले. त्यावर गोयल यांनी घाबरून एक हजार रुपये त्याला दिले. त्यानंतरही या गुंडाने दुकानाच्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांकडे पाहून कोयता उगारला. ‘तुम लोगोंको बाळाभाई का डर नही लगता क्या’, अशीच धमकी देत तो पुढे निघून गेला.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ या गुंडाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!