मातोश्रीच्या अंगणात घड्याळाची ‘टिकटिक’ होणार की ‘मशाल’ पेटणार? ; काय आहे वांद्रे पूर्व विधानसभेची सद्यस्थिती?
विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 288 विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून एक ते दोन दिवसात उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता निर्माण झाली. अशातच काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांनी ‘वांद्रे पूर्व’च्या उमेदवारांची घोषणाच करून टाकली.
वांद्रे पूर्व हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला 2019 म्हणून ओळखला जात होता. याच मतदारसंघात ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचा समावेश आहे. या मतदारसंघातून 2009 आणि 2014 या दोन्ही निवडणुका शिवसेनेचे प्रकाश उर्फ बाळा सावंत विजयी झाले होते. तर 2015 मध्ये बाळा सावंत यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत नारायण राणे ही तृप्ती सावंत यांच्याविरोधात निवडणूक लढवली आणि नारायण राणे यांचा पराभव करत तृप्ती सावंत यांनी विजय मिळवला. मात्र त्यानंतर 2019 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली होती तृप्ती सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मात्र तृप्ती सावंत यांचा पराभव झाला आणि शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचाही पराभव झाला आणि काँग्रेसचे झिशान बाबा सिद्दीकी विजयी झाले.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात कशी लढत झाली होती?
-
2019 च्या विधानसभा निवडणुकी मध्ये काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी, शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर, तृप्ती बाळा सावंत या अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात होत्या.
-
या निवडणुक झीशान सिद्दिकी यांचा 38 हजार 337 मतं मिळवत विजय झाला
-
शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांना 32547 मतं मिळाली होती
-
अपक्ष म्हणून निवडणुक लढवणाऱ्या तृप्ती सावंत यांना या निवडणुकीत 24 हजार 71 मतं मिळाली होती
दरम्यान यानंतर तृप्ती बाळा सावंत यांनी 6 एप्रिल 2021 रोजी शिवसेनेतून बाहेर पडत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. दरम्यान आता या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला तर महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वांद्रे पूर्वची जागा सुटण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांना तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे मातोश्रीच्या अंगणात आगामी निवडणुकीत घड्याळाची टिकटिक होणार की मशाल पेटणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे
