मुस्लिम समुदायाचे श्रद्धास्थान असलेल्या मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महंत रामगिरी महाराज अडचणीत आलेत. त्यांच्यावर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी गुन्हे देखील दाखल झालेत. त्यातच त्यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतरही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्या मंचावर दिसले. त्यामुळे महंत रामगिरी महाराज हे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे.
रामगिरी महाराज कोण आहेत ?
महंत रामगिरी महाराज एक धर्मगुरू म्हणून प्रचलित आहेत. अनेक वर्षांपासून ते आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून अनुयायांना नीति मूल्यांवर आधारित जीवन कसे जगावे याचा संदेश देतात. आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून ते प्राचीन पवित्र शास्त्रांमधील विविध श्लोकांचं स्पष्टीकरण देतात. देशाच्या विविध काना कोपऱ्यात त्यांची प्रवचनं होतात. त्यामुळेच देशभरात त्यांचे बहुसंख्य अनुयायी आहेत. हेच रामगिरी महाराज सध्या सरला बेटाचे महंत आहेत. त्यांचा आधी नारायण गिरी महाराज हे या ठिकाणचे महंत होते. त्यांचे निधन झाल्यानंतर रामगिरी महाराज हे महंतांच्या गादीवर विराजमान झाले. 2009 पासून आज पर्यंत सरला बेटाची गादी त्यांनी सांभाळली आहे. यात सरला बेटावर गुरुकुल पद्धतीने शिष्यांना ज्ञान दिलं जात. त्यामुळे या बेटावर शेकडो वर्षांपासून ची गुरु- शिष्य परंपरा आजतागायत चालू आहे. याच ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं. ज्यामध्ये महंत रामगिरी महाराज हे अनुयायांना संबोधित करतात.
महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंधरा वर्षांमध्ये सरला बेटाचा मोठा विकास झाला. धार्मिक क्षेत्राबरोबरच पर्यटन क्षेत्र म्हणून देखील सरला बेट ओळखलं जात आहे. ये बेटाच्या शेजारीच असलेल्या शनिदेव गाव या ठिकाणचा देखील मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आलाय. त्यामुळे वर्षभर या दोन्ही धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. त्यामुळेच रामगिरी महाराजांच्या अनुयायांची संख्या देखील वाढत आहे. मात्र मोहम्मद पैगंबर आणि मुस्लिम समुदाया विषयी त्यांनी केलेल्या विधानामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकतो, यामुळे त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.