अजित पवार गटाचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे सध्या सगळीकडेच दहशतीचं वातावरण आहे. तर दुसरीकडे ही हत्या सिद्दिकी यांची अभिनेता सलमान खान बरोबर असलेली मैत्री यामुळे झाली असल्याच्या चर्चा आहेत. तशाच अर्थाचं विधान बिश्नोई गॅंगने हत्येची जबाबदारी स्वीकारताना केलं होतं. त्यामुळेच आता सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षितही मोठी वाढ करण्यात आली आहे. सलमान खान याच्या जीवाला असलेला धोका ओळखून आता त्याचीच एक गर्लफ्रेंड असलेल्या एका अभिनेत्रीने कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला तुरुंगातून व्हिडिओ कॉल करण्याचं आवाहन केलं आहे.
ही अभिनेत्री आहे, सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली. सोनी ही सध्या अमेरिकेत राहते आणि तिने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट करत लॉरेन्सला व्हिडिओ कॉल करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे.
काय म्हणाली सोमी?
सोमी अलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लॉरेन्स बिष्णोईचा फोटो शेअर केला आहे. त्याखाली लिहिलेलं कॅप्शन हे सध्या चर्चेत आहे. तिने लिहिलं आहे की, “हा माझ्याकडून लॉरेन्स बिष्णोईला थेट संदेश आहे. नमस्कार, लॉरेन्स भाई! मी ऐकलं आहे आणि पाहिलंही आहे की तुम्ही जेलमधून झूम कॉल करु शकता. मलाही तुमच्याशी काही बोलायचं आहे. ते कसं काय शक्य होईल हे कृपया मला सांगा. माझ्या जगातील सर्वात आवडत्या जागांमध्ये राजस्थान आहे. आम्हाला तुमच्या मंदिरात पूजेसाठी येण्याची इच्छा आहे. पण त्याआधी तुमच्यासोबत झूम कॉलवर बोलायचं आहे. पूजेनंतर काही गोष्टी बोलून ठरवायच्या आहेत. या तुमच्या फायद्याच्याच गोष्टी आहेत यावर विश्वास ठेवा. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर दिलात तर फार उपकार होतील. धन्यवाद!”
गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्सने पाकिस्तानमधील एका गुंडाला व्हिडिओ कॉल केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे तुरुंगात असलेला लॉरेन्स हा व्हिडिओ कॉल कसा काय करतो हा मोठा प्रश्न उपस्थित झालाय. त्यातच आता सोमी अलीने देखील लॉरेन्स कडे व्हिडिओ कॉल करण्याची मागणी केली आहे. याआधीही सोमीने सलमान खानच्या वतीने बिश्नोई समाजाचे माफी मागितली होती. तशाच पद्धतीने ती आता लॉरेन्सची माफी मागण्याच्या विचारात आहे आणि त्यासाठीच ती झूम कॉल करण्याची विनंती करत आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.