पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या विस्तारित मार्गिकेची निविदा प्रक्रिया सुरु

2532 0

पुणे; पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिका १ आणि मार्गिका २ मिळून एकूण २४ किमी मार्गावर प्रवासी सेवा सुरु झाली आहे. उर्वरित ९ किमी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले असून लवकरच पुणे मेट्रोची पहिल्या टप्प्यातील संपूर्ण मार्गिका प्रवाश्यांसाठी खुली करण्यात येणार आहे. पुणे मेट्रोतील स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका या मार्गिका १ मधील प्रवाश्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी (भक्तीशक्ती चौक) या मार्गाच्या विस्तारीकरणाची निविदा महामेट्रोने शनिवारी प्रसिद्ध केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी (भक्तीशक्ती चौक) या विस्तारित मार्गाला केंद्र सरकारने दिनांक २३/१०/२०२३ रोजी मान्यता दिली. या मार्गाची एकूण लांबी ४.५१९ किमी असून या मार्गिकेचा एकूण खर्च ९१०.१८ कोटी इतका आहे. या मार्गाच्या व्हायाडक्तच्या कामाची निविदा प्रकाशित झाली आहे. या संपूर्ण विस्तारित मार्गाचे काम ३ वर्षे आणि ३ महिन्यात पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे

या मार्गिकेचे बांधकाम स्वीकृती पत्र मिळाल्यापासून १३० आठवड्यात पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. हा संपूर्ण मार्ग उन्नत असून या मार्गावर चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्तीशक्ती चौक ही ४ स्थानके असणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते चिंचवड स्थानकातील अंतर १.४६३ किमी, चिंचवड स्थानक ते आकुर्डी स्थानकातील अंतर १.६५१ किमी, आकुर्डी स्थानक ते निगडी स्थानकातील अंतर १.०६२ किमी आणि निगडी स्थानक ते भक्ती शक्ती चौक स्थानकातील अंतर ९७५ मीटर असणार आहे. संबंधित निविदेची माहिती पुणे मेट्रोच्या www.punemetrorail.com या अधिकृत संकेतस्थळाला अथवा https://eprocure.gov.in या सीपीपी संकेत स्थळाला भेट देऊन मिळवू शकता. हे जलद गतीने पूर्ण होण्यासाठी व्हायाडक्त बांधण्याबरोबरच ठेकेदाराला स्थानकाचे कोनकोर्स व फलाटाच्या स्लॅबचे काम करावे लागणार आहे. यामुळे स्थानकाच्या बांधणीचा वेळ वाचणार आहे. अश्याप्रकारचे नियोजन महामेट्रोमध्ये राबविण्यात येत आहे.

याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हंटले आहे की, “या विस्तारित मार्गिकेमुळे चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्तीशक्ती चौक हे विभाग मेट्रो नेटवर्कला जोडले जाणार आहेत. यामुळे त्या भागातील राहणाऱ्या हजारो नागरिकांना त्याचा आहे.”

Share This News
error: Content is protected !!