आपल्यापैकी सर्वांनीच बालपणी एक खेळ खेळलाय. गोल रिंगण खालून बसायचं… हात जमिनीवर ठेवायचा आणि त्यातल्या एका बोटाला कुणीतरी एकानं उडण्याचा आदेश द्यायचा… उदा. चिमणी उड, कावळा उड, पोपट उड, बस उड… पोपटापर्यंत ठीक आहे पण बस उड ? हे काही आपल्या बुद्धीला पटत नाही. येड्या, बस कधी उडते का ?
………………….
आपले केंद्रीय रस्तेविकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र ‘हो, बस उडू शकते,’ असं सांगून आपल्या बालबुद्धीलाच छेद दिला. उडत्या बसेसची योजना आणली तर पुण्यातल्या ट्रॅफिकची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकेल, असं सांगत गडकरींनी पुण्यातील ट्रॅफिक समस्येवर भन्नाट उपाय सुचवला. चांदणी चौकातील वाहतूक समस्या आणि इतर मुद्द्यांवर पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गडकरींनी पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नव्या योजनांवर काम सुरू असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी उडत्या बसेसचा उल्लेख केला.
……………………………
पुणेकर उडणार हवेत की घोषणा विरणार ‘हवेत’ ?
“आम्ही 165 रोप वे केबल कार बांधतोय. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. त्यात 150 लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. ती डॉफल मेअरची आहे. त्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. वरच्यावरून वाहतूक गेली तर त्याचा फायदा होईल. त्यासोबतच ट्रॉली बसचा एक पर्याय आहे. त्यात दोन बस जोडल्या जातात आणि ती इलेक्ट्रिक केबलवर चालते. इलेक्ट्रिक बसची किंमत सव्वाकोटी आहे. तेवढ्याच क्षमतेच्या या ट्रॉलीबसची किंमत 60 लाख आहे. त्यामुळं भांडवल गुंतवणूक कमी आहे. पुणे पालिकेनं अशी काही योजना तयार केली तर आम्ही त्यासाठी पैसे देऊ शकतो”, असंही नितीन गडकरींनी यावेळी जाहीर केलं.
…………………..
आजच्या विज्ञानयुगात हे सारं शक्य असलं आणि काही देशांमध्ये उडत्या बसेस हवेत उडत असल्या तरी आपल्या पुण्यात हे शक्य आहे का ? बरं, ज्यांना दोन-तीन मजली इमारतीच्या टेरेसवरून साधं खाली पाहतानाही घेरी येते त्यांच्या हवेत उडण्याच्या स्वप्नाचं काय ? वृद्ध, आजारी माणसांचं काय ? वगैरे वगैरे. एकूणच काय तर गडकरींनी भलेही पुणेकरांना हवेतून प्रवासाचं स्वप्नं दाखवलं असलं तरी पुणेकरांचा हा हवेतला प्रवास त्यांया झोपेतल्या स्वप्नापुरताच मर्यादित राहू नये म्हणजे मिळवली ! नाहीतर आपल्या बालपणीच्या त्या खेळासारखं व्हायचं…
चिमणी उड, कावळा उड, पोपट उड, बस उड… पोपटापर्यंत ठीक आहे पण बस उड ? येड्या, बस कधी उडते का ?
– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक,TOP NEWS मराठी