‘मंत्री सिद्दिकी यांची हत्या झाली म्हणजे संपूर्ण कायदा सुव्यवस्था ढासळली असं नाही’; माजी पोलीस आयुक्त आणि भाजप नेते सत्यपाल सिंह यांच विधान

117 0

‘मुंबईत एका गँगस्टरने माजी मंत्र्याला मारले म्हणजे संपूर्ण राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली असं नाही’, असं वक्तव्य चक्क सेवानिवृत्त पोलीस आयुक्त आणि माजी मंत्री सत्यपाल सिंह यांनी केलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

पुण्यात भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना सत्यपाल सिंह यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असल्यामुळेच परकीय गुंतवणूक वाढली आहे, असं विधान सत्यपाल सिंह यांनी केल्यामुळे पत्रकारांनी त्यांना बाबा सिद्दिकी यांच्या हत्येसंदर्भात त्यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना सत्यपाल सिंह म्हणाले, ‘हायवेवर एखादा अपघात घडला म्हणजे पूर्ण हायवेच खराब आहे, असा अर्थ होत नाही. तसंच मुंबईत एका गँगस्टरने मंत्र्याला मारलं म्हणजे पूर्ण राज्यातील कायदा सुव्यवस्थ ढासाळली आहे असं नाही. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था अबाधित असल्यामुळेच राज्यात परकीय गुंतवणूक वाढत आहे. तर बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करत आहेत’, असं ते म्हणाले. मात्र माजी पोलीस आयुक्त असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे विधान केल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

नक्षलवाद कमी झाला…

‘ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन भाजपने केले, त्यांचे आता उद्‍घाटनही होत आहे. लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले जात होते, भविष्यात 2100 रुपये दिले जातील. शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेतून 15 हजार रुपये मिळणार आहेत. मी 35 वर्ष पोलीस खात्यात काम केलं आहे. त्याकाळी नक्षलवाद मोठ्या प्रमाणात होता. त्याचबरोबर काही शहरात बॉम्बस्फोटही झाले. मात्र आता नक्षलवाद कमी झाला असून धार्मिक दंगली होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे’, असे देखील सत्यपाल सिंह या पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!