सजग नागरिक घडविण्यासाठी छात्र संसद उपयुक्त – चंद्रकांत पाटील

180 0

पुणे: देशात सजग नागरिक घडविण्यासाठी ‘भारतीय छात्र संसद’ सारखे उपक्रम उपयुक्त ठरतील आणि या माध्यमातून विविध कायदे तयार करताना चांगली मते मांडणारे नागरिक तयार होतील, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आयोजित बाराव्या छात्र संसदेत ते बोलत होते. कार्यक्रमाला विद्यापीठाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड आणि राहुल कराड उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, देशातील कायदा सर्व धर्म आणि जातींसाठी समान आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना तयार करताना भविष्याचा विचार करून तयार केली असून त्याद्वारे प्रत्येकाला समान अधिकार देण्यात आले आहेत. राज्यघटनेतील तत्वाला अनुसरून देशातील पुरुष आणि महिलांमधील विषमता दूर करण्यासाठी कायद्याची गरज आहे. त्यासाठी समाजातील विविध घटकांनी चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले.

सामान्य कुटुंबातील व्यक्तीने समाजासाठी परिश्रमपूर्वक कार्य केल्यास ती उच्च पदावर जाऊ शकते आणि हेच आपल्या लोकशाहीची वैशिष्ठ्य आहे. युवकांनी छात्र संसदसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून विविध विषय जाणून घ्यावे. नेतृत्वाचे विचार जसेच्या तसे न स्विकारता त्यावर चर्चा आणि सकारात्मक दिशेने वादविवादही करावा असेही ते म्हणाले.

भारतीय लोकशाहीच्यादृष्टीने भारतीय छात्र संसदेचा उपक्रम महत्वपूर्ण, उपयुक्त आणि दिशादर्शक आहे, अशा शब्दात त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

Share This News
error: Content is protected !!