विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण कुणाला कोणतं खातं दिलं जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या पार्श्वभूमीवर 28 नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक पार पडली.
या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित होते. या बैठकीत अनेक गोष्टींवर सखोल चर्चा झाली असून मुख्यमंत्रीपदासह महसूल आणि गृह खातं हे भारतीय जनता पक्षाकडे राहणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असून नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खातं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे अर्थमंत्री पद हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहील हे जवळपास निश्चित झालं होतं मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार अर्थ खात्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दावा केल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार दिल्लीत मुक्कामी
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले असून अमित शाह हे सध्या चंदिगड या ठिकाणी असून चंदिगड वरून आल्यानंतर अजित पवार आणि अमित शाह यांची भेट होण्याची शक्यता असून या भेटीत अर्थ खात आपल्याकडेच राहावं या दृष्टिकोनातून अजित पवार अमित शहांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.