पुण्यात राज ठाकरेंची सभा होणार मात्र…; या 13 अटी पाळाव्या लागणार

305 0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पुन्हा एकदा अटींच्या कचाट्यात सापडली आहे. औरंगाबादनंतर उद्या पुण्यात होणाऱ्या सभेला जरी परवानगी मिळाली असली तरी या सभेसाठी 13 अटी घालण्यात आल्या आहेत.

पुण्यात होणाऱ्या ‘राज’सभेसाठीच्या अटी पुढीलप्रमाणे :

1. समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्ये टाळावीत

2. सभेत रुढी, परंपरा, वंश यावरून चिथावणी दिली जाणार नाही याची काळजी घ्यावी

3. सभेच्या ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे

4. कार्यक्रमात शस्त्र, तलवारी, बाळगू नये तसेच कायदेशीर नियमांचं पालन व्हावं

5. सभेला येणाऱ्या लोकांची तपासणी करण्याचा अधिकार पोलिसांना असणार आहे

6. सभेमध्ये येणाऱ्या लोकांनी स्वयंशिस्त पाळावी

7. या सभेचे नियम पाळावेत हे लोकांना कळवण्याची जबाबदारी ही आयोजकांवर असणार आहे

8. सभेत क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास किंवा चेंगराचेंगरी झाल्यास त्याला आयोजक जबाबदार असणार आहे.

9. कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळेत बदल करता येणार नाही.

10. व्यासपीठावरील संख्या ही निश्चित असावी आणि ती पोलिसांना कळवण्यात यावी

11. स्वागत फलकामुळे रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी

12. कार्यक्रमामुळे रुग्णवाहिका, वाहनांना अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी

13. सभेला येणाऱ्या महिला आणि लहान मुलांची व्यवस्था करावी

औरंगाबादेतल्या सभेला स्थानिक पोलिसांनी 16 अटी घातल्या होत्या मात्र यातल्या अनेक अटींचं पालन न झाल्यानं राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता पुण्यात तरी अटींचं पालन होणार की औरंगाबादची पुनरावृत्ती होणार हे उद्याच्या सभेदरम्यानच कळू शकेल.

Share This News
error: Content is protected !!