नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) नुकताच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. आणि आता ‘द ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ या फ्रान्समधील सर्वोच्च पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना गौरविण्यात आल आहे. नागरी आणि लष्करी असे या पुरस्काराचे स्वरूप असून जगातील लोकप्रिय राष्ट्रीय सन्मानापैकी हा एक पुरस्कार मानला जातो.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. ‘द ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. भारत आणि फ्रान्समधील सामरिक भागीदारीला 25 वर्षं पूर्ण होत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फ्रान्स दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
या पुरस्कारानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर लिहिले, “मी नम्रतेने ‘द ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ या पुरस्काराचा स्वीकार करतो. हा भारतातील 140 कोटी जनतेचा सन्मान आहे. या प्रेमासाठी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रेंच सरकार आणि नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो. यातून फ्रान्सची भारताबद्दलची नितांत आपुलकी आणि भारताशी मैत्री वाढविण्याचा संकल्प दिसून येतो.”
राष्ट्रसेवेत योगदान देणाऱ्या फ्रेंच नागरिकांना हा पुरस्कार देण्यात येत असतो. तसेच फ्रान्सशी सहकार्य साधणाऱ्या परदेशी नागरिकांना आणि फ्रान्सच्या निमंत्रणावर आलेल्या उच्चपदस्थ मान्यवरांना सदर पुरस्काराने कधी कधी गौरविण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत 14 विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. नुकतेच त्यांना इजिप्तने ‘ऑर्डर ऑफ द नाइल’ या पुरस्काराने गौरविले होते. फ्रान्सने दिलेल्या पुरस्काराने पुन्हा एकदा भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.