छत्रपती शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. काही दिवसांपूर्वी महागड्या आलिशान रोल्स रॉईस गाडीबरोबर प्रशांत कोरटकर चे फोटो व्हायरल झाले होते. या गाडी विषयीची कोणतीही माहिती द्यायला कोरटकर तयार नव्हता. अखेर या गाडीचा मूळ मालक आणि हे फोटो कधी आणि कुठे काढले हे समोर आलंय.
ही आलिशान रोल्स रॉईस गाडी प्रशांत कोरटकरची असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्याने इतकी आलिशान गाडी कशी खरेदी केली ? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला होता. मात्र आता या गाडीचा खरा मालक समोर आलाय. ही गाडी खरंतर पिंपरी चिंचवड मध्ये राहणाऱ्या बांधकाम व्यवसायिक तुषार कलाटे यांची आहे. कलाटे यांच्या फार्महाउस वर ही गाडी अनेक दिवसांपासून उभी आहे. WB-02-AB 123 या क्रमांकांच्या या रोल्स रॉईससोबत तुषार कलाटे यांचे फोटो देखील आहेत. साधारण सहा ते सात वर्षांपूर्वी त्यांनी ही गाडी खरेदी केली होती. त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तीन-चार महिन्यांपूर्वी कोरटकर एका कॉमन मित्राबरोबर पुण्यात मला भेटायला आला होता. त्यावेळी त्याने फोटो काढण्यासाठी या गाडीची एक राईट मिळेल का? असं विचारलं.. आणि पत्रकार असल्यामुळे मी त्याला राईट मारायला गाडी दिली, असं तुषार कलाटे यांचं म्हणणं आहे.
या आलिशान रोल्स रॉईस गाडीची आणखी माहिती काढली असता ही गाडी चक्क महेश मोतेवार याची असल्याचं आढळून आलं आहे. लाखो गुंतवणूकदारांची 4700 कोटींची फसवणूक करणाऱ्या मोतेवारला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या मालमत्तांचा लिलाव करून हे पैसे गुंतवणूकदारांना देणं अपेक्षित असताना तसं न करता अधिकाऱ्यांनी परस्पर ही मालमत्ता लाटल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कोरटकरच्या पोलिसांशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून ही गाडी कलाटेंना मिळाली का ? असा संशय व्यक्त केला जात आहे. तर कलाटे यांनी आपण बँकेच्या ऑक्शन मधून गाडी खरेदी केल्याचं म्हटलं आहे.
या गाडीच्या व्यवहारामागे काही संशयास्पद बाबी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोतेवार कडून जप्त केलेली ही गाडी कलाटे यांच्याकडे कुठून व कशी आली ? त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात तथाकथित बाबा मनोहर भोसले देखील दिसत आहे. या भोसलेवर आधीपासूनच अघोरी विद्येच्या माध्यमातून लोकांची फसवणूक आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे कोरटकर, कलाटे आणि भोसले यांचा नेमका संबंध काय ? यांची मैत्री कशी झाली ? याचा तपास सुरू आहे.
रोल्स रॉईस कुणाची आहे, हे तर समोर आलं.. मात्र या गाडीविषयी पोलीस चौकशीत प्रशांत कोरटकर काहीच माहिती द्यायला तयार का नव्हता ? गाडी बाबतीत त्याने इतकी चुप्पी का बाळगली ? हा प्रश्न निर्माण होत आहे. तर एकीकडे कोरटकर आणि कलाटे यांचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून दुसरीकडे कलाटे मात्र आपण कोरटकरला फारसे ओळखत नाही. त्याने राईड मागितल्यामुळे मी गाडी त्याला दिली होती. मात्र त्यानंतर आमचा कधीही संपर्क झालेला नाही असं सांगितलं. त्यामुळे या प्रकरणात कोरटकर आणि कलाटे यांचा एकमेकांशी खरंच संबंध आहे की नाही ? मनोहर भोसले याचा आणि या दोघांचा काय संबंध ? आणि ही गाडी कलाटेंकडे कशी आली याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे