पुण्यातील अपघात रोखण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. या अंतर्गत आता अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलांकडून होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिसांकडून कठोर उपाय योजना करण्यात येत आहेत.
पुणे वाहतूक पोलिसांनी 1 जानेवारी ते 15 जुलै या केवळ साडे सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल 43 अल्पवयीन मुलांवर दंडात्मक कारवाई केली आहे. वारंवार अल्पवयीन मुलांकडून बेदरकार वाहने चालवणे, अपघात घडणे, वाहतूक नियमांचा उल्लंघन करणे, अशा घटना घडत असतात. याच्यावर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून कठोर उपाय योजना करण्यात येणार आहेत.
कोणती कठोर कारवाई होणार ?
अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास किंवा वाहतुकीचे नियम तोडताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अल्पवयीन मुलांकडे आढळलेले वाहन पुढील वर्षभर रस्त्यावर आणता येणार नाही. तसे हमीपत्र संबंधीत मुलांकडून आणि त्यांच्या पालकांकडून लिहून घेतले जाणार आहे. ज्या वाहनावर वर्षभरासाठी बंदी घातली असेल ते वाहन बंदी घातलेल्या कालावधीत रस्त्यावर आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. तसेच अल्पवयीन मुलाला 25 वर्षांपर्यंत लायसन्स दिले जाणार नाही, अशी माहिती आपण पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे.