कणकवली- संतोष परब हल्ला प्रकरणी अटक करण्यात आलेले भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांना 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नितेश राणे यांना सुनावण्यात आलेली दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत आज, शुक्रवारी संपणार होती. त्यामुळे आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. पुण्यात जाऊन या प्रकरणाचा तपास करायचा आहे. याबाबत आर्थिक व्यवहार झाला आहे का, याची देखील माहिती घ्यायची असल्याचं सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयासमोर सांगितले. त्यामुळे आणखी आठ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान नितेश राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आम्ही तपासात सहकार्य केलं असून आता वाढीव कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर केला. त्यामुळे न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नितेश राणे यांना 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयासमोर राणे समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आधी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांना कोर्टात शरण येण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, तत्पूर्वीच नितेश राणे हे सिंधुदुर्ग न्यायालयात हजर राहून त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता.
मात्र, न्यायालयानेही त्यांना जामीन दिला नाही. त्यानंतर राणे अखेर न्यायालयासमोर शरण आले होते. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज, शुक्रवारी राणे यांच्या पोलीस कोठडीची मदत संपणार होती.