Praful Patel

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा;उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

405 0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यसभेसाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाच्या नावाची घोषणा होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागलेली असताना आणि महायुतीतील भाजप आणि शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले असताना आज सायंकाळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा केली.

राज्यसभेसाठी उद्या गुरुवारी दुपारी साडे बारा वाजता (१५ फेब्रुवारी रोजी) खासदार प्रफुल पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

काही तांत्रिक बाबींचा विचार करत प्रफुल पटेल यांना उमेदवारी देण्याचा कोअर कमिटीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. ते विजयी झाल्यानंतर त्यांची जागा ताबडतोब रिक्त होईल. ती जागा रिक्त झाल्यानंतर मे महिन्यामध्ये पोटनिवडणूक लागेल त्यावेळी इतर नावांचा विचार केला जाणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना पंधरा दिवसाची मुदतवाढ दिली होती ती आता उद्या संपत असून विधानसभा अध्यक्षांकडून निकाल अपेक्षित आहे. युक्तीवादात आमची कायदेशीर बाजू मांडायची होती ती आम्ही मांडलेली आहे. त्यामुळे उद्या निकालाची वाट बघुया असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले.

Share This News
error: Content is protected !!