आज देशभरात 78 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत आहे. परंपरेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवून देशातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर समजतो भारतीयांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी इतर देशांना भारताच्या वतीने संदेश दिला. आमचा बुद्धांचा देश आहे, युद्ध हा आमचा मार्ग नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले की, ‘ज्या शूरवीरांनी देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आजचा दिवस आहे. ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्यांचे आम्ही ऋणी आहोत. 2047 पर्यंत भारताला विकसीत करण्याचे स्वप्न पूर्ण होईल. पण या सगळ्यांमध्ये आपल्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. काही आव्हान देशांतर्गत असतील तर काही बाहेरची असतील. आम्हाला आव्हान देणाऱ्यांना आम्ही देखील आव्हान देऊ शकतो. भारत जेव्हा समृद्ध देश होता तेव्हा देखील आम्ही इतर देशांना युद्धात ढकलले नाही. आमचा देश बुद्धांचा आहे, युद्ध हा आमचा मार्ग नाही. त्यामुळे इतर देशांनी असा विचार करू नये, भारत विकसित झाला तर इतर देशांसाठी संकट बनेल.’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर राष्ट्रांना बुद्धांच्या शांतीचा संदेश देत भारताच्या प्रगतीवर इतर देशांनी चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगितले.