केरळ : वृत्तसंस्था – ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट शुक्रवारी देशभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटावरून देशात मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहे. काही लोक या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करत आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयात (Kerala High Court) दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना द केरळ स्टोरीच्या रिलीजला स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.
केरळ उच्च न्यायालयाने ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला. इतकंच नाही तर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाविरोधात आक्षेपार्ह काहीही नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. तथापि, चित्रपट निर्मात्याने न्यायालयाला आश्वासन दिले आहे की ‘केरळमधील 32,000 हून अधिक महिला ISIS मध्ये सामील झाल्या’ असा दावा करणारा वादग्रस्त टीझर सोशल मीडियावरून काढून टाकला जाईल.
उच्च न्यायालयात 5 याचिका दाखल झाल्या
उच्च न्यायालयात या चित्रपटाच्या विरोधात 5 याचिका दाखल झाल्या. इंडियन युनियन मुस्लिम लीगनेही याचिका दाखल केली होती. ‘द केरळ स्टोरी’च्या ट्रेलरमध्ये ब्रेन वॉश, लव्ह जिहाद, हिजाब आणि ISIS सारखे शब्द वापरण्यात आले आहेत. हा चित्रपट मुस्लिमांच्या विरोधात आहे. याचिकेत ‘द केरळ स्टोरी’वर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टाने चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर दोन्ही खुल्या कोर्टात पाहिले. न्यायालयाने म्हटले, सीबीएफसी सारख्या प्राधिकरणाने चित्रपटाचे परीक्षण केले आहे आणि तो रिलीजसाठी अयोग्य असल्याचे आढळले आहे.
सेन्सॉर बोर्डाने कात्री फिरवली
यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने (Censor Board)’द केरळ स्टोरी’ला ए प्रमाणपत्र दिले होते. यासोबतच चित्रपटातून दहा वादग्रस्त दृश्ये काढून टाकण्यात आली आहेत. केरळचे माजी मुख्यमंत्री व्हीएस अच्युतानंदन (Former Chief Minister VS Achuthanandan) यांचे विधान ‘द केरळ स्टोरी’मधून काढून टाकण्यात आले होते, ज्यात ते म्हणाले होते की, ‘दोन दशकांत केरळ मुस्लिम लोकसंख्या असलेले राज्य बनेल. कारण तरुणांना इस्लामसाठी प्रभावित केले जात आहे. चित्रपटातून ते दृश्यही काढून टाकण्यात आले आहे, ज्यामध्ये हिंदू देव चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले होते. ‘भारतीय कम्युनिस्ट हे सर्वात मोठे ढोंगी आहेत’ या चित्रपटातील संवादातून ‘भारतीय’ हा शब्दही काढून टाकण्यात आला आहे.