पुणे: भाजपा आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर असून 27 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 2 मार्च रोजी मतमोजणी पार पडणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली असून चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमधील ‘देवाशिष’ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे.
या बैठकीनंतर भाजपा कसब्यातील आपला उमेदवार जाहीर करण्याची शक्यता असून कसबा पोटनिवडणूक लढण्यासाठी भाजपाकडून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक, मुलगा कुणाल टिळक, माजी सभागृह नेते गणेश बीडकर, माजी नगरसेवक आणि पुणे शहराचे प्रभारी धीरज घाटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या नावाची चर्चा असून याशिवाय कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे.