पुणे : पुण्यातील रॅपिडो कंपनीला हायकोर्टाने सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. अर्थात या संदर्भात पुढील सुनावणी ही येत्या शुक्रवारी 20 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे पुण्यात रॅपिडो बाईक टॅक्सी कंपनीला सेवा बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर 20 जानेवारीपर्यंत राज्यभरातील सर्व सेवा बंद करण्याची ताकीद देण्यात आली आहे. त्याबरोबर पुण्यातील नागरिकांनी देखील तीन चाकी आणि दुचाकी रॅपिडोने प्रवास करू नये असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
दरम्यान राज्य सरकारने बाईक टॅक्सी बाबत एक स्वतंत्र समिती स्थापन केली असून, ही समिती लवकरच याबाबत आपला अहवाल सादर करेल मात्र तोपर्यंत तात्काळ रॅपिडो ही सेवा बंद करण्याची राज्य सरकारची मागणी आहे. तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महाराष्ट्र राज्यात शासनाने किंवा राज्य परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी अशा प्रकारची कोणतीही योजना अद्याप राबवलेली नव्हती आणि बाईक टॅक्सी प्रकारचा परवाना जारी केला नव्हता तसेच बाईक टॅक्सी बाबत भाडे आकारणी धोरण अस्तित्वात नाही त्यामुळे बाई टॅक्सी बाबत एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे बाईक टॅक्सी सोबत कंपनीची रिक्षा डिलिव्हरी या सेवा ही विनापरवाना असल्याचं उघड झाल्यानंतर ही सेवा पुरवणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या चालकाच्या विरोधात बंडगार्डन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.