मुंबई : करुणा शर्मा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे स्थित कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयावर माझगाव सत्र न्यायालयाने शनिवारी
शिक्कामोर्तब केले. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांना जोरदार झटका बसला आहे.
वांद्रेस्थित कौटुंबिक न्यायालयाने गेल्याच महिन्यात धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना दरमहा २ लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर शनिवारी झालेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांनी आपल्या लग्नाचे विविध पुरावे सादर केले. आपणच मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा त्यांनी केला. मुंडे यांच्या वकिलांनी त्यांचा हा दावा धुडकावून लावला होता.
तत्पूर्वी, माझगाव कोर्टात आज धनंजय मुंडे व करुणा शर्मा मुंडे यांच्या वकिलांत जोरदार युक्तिवाद झाला. त्यात धनंजय यांच्या वकील सायली सावंत यांनी करुणा शर्मांनी सादर केलेल्या पुराव्यांचे कोणतेही महत्त्व नसल्याचा दावा केला. धनंजय मुंडे यांचे करुणा शर्मा यांच्याशी लग्न झाले नाही. कोर्टाने त्यांना आपल्या लग्नाचे पुरावे आणण्याचे आदेश दिले होते. पण त्यांनी वसियतनामा व स्वीकृतीपत्र वगळता इतर दस्तऐवज आणले. त्याला काही अर्थ नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.
धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच करुणा शर्मा माझ्या पत्नी नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी तसे कागदपत्रेही कोर्टात सादर केली आहेत. करुणा यांच्या वसियतनाम्यावरून त्या मुंडे यांच्या पत्नी असल्याचे सिद्ध होत नाही. हा वसियतनामाच खोटा आहे.
याप्रकरणी करुणा यांची दोन्ही मुले माझीच आहेत, पण त्या माझ्या पत्नी नाहीत, असे ते म्हणाले होते. अखेर न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावली. कौटुंबिक न्यायालयाने यासंबंधी आधी दिलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
माझगाव न्यायालयात २९ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्यासोबत झालेल्या लग्नाचे पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार करुणा यांनी आज आपल्या मुलांचे पासपोर्ट, जन्माचे प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज, विमा पॉलिसी, वसियतनामा, स्वीकृतीपत्र आदी विविध दस्तऐवज न्यायालयापुढे सादर केले. आपणच मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असल्याचा दावा त्यांनी केला होता.