सोलापूर- सोलापुरातील मध्यवर्ती भागात असलेल्या चाटी गल्लीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीमध्ये जुना लाकडी वाडा भस्मसात झाला. ही घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या ठिकाणी जुने वाडे असून अनेक रहिवासी या ठिकाणी वास्तव्य करतात. दुपारी दोन वाजण्याच्या सुंमारास गॅसच्या सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर आगीच्या ज्वाळांनी हा वाडा पेटला. वारा असल्यामुळे ही आग आसपासच्या घरात पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. ही गल्ली चिंचोळी असल्यामुळे आग विझवण्यात अडचण येत होती. फायर बॉल च्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते.
ही आग इतकी भीषण होती की आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण वाडा जळून खाक झाला. सुदैवाने आज रंगपंचमी असल्यामुळे या घरातील लोक दुसरीकडे गेले होते. आग लागल्याचे समजताच वाड्यातील इतर रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान या स्फोटाचे नेमके कारण समजले नाही.
हा वाडा डॉ. अफजलपूरकर यांचा असल्याची माहिती समोर आली आहे.