ED OFFICE FIRE:मुंबई : मुंबईतील फोर्टस्थित बलार्ड इस्टेट भागात सक्त वसुली संचालनालयाचे (ईडी) कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला रविवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत अनेक चौकशी प्रकरणातील महत्वाच्या फायली जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
सुट्टीच्या दिवशी लागलेली ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना तब्बल सात तास परिश्रम घ्यावे लागले. या आगीत ईडी कार्यालयातील महत्वाचे दस्तावेज, कागदपत्रे, असंख्य फायली आणि संपूर्ण फर्निचर भस्मसात झाले. रविवारी सकाळी ९ वाजता ही आग विझवण्यात आली. या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक प्रकरणांच्या चौकशीच्या फायली जळाल्याने तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक फसवणूक (१२२ कोटी), ललित टेकचंदानी मालमत्ता प्रकरण (४४.०७ कोटी), विंध्यवासिनी ग्रुप बँक फसवणूक (७६४.४४ कोटी), साई ग्रुप फ्लॅट फसवणूक (७२ कोटी), पॅनकार्ड क्लब्स गुंतवणूक फसवणूक (४५०० कोटी), रियाल्टो एक्झिम आणि पुष्पक बुलियन प्रकरण (१४२.७२ कोटी) NSEL फसवणूक प्रकरण (५५७४ कोटी) महादेव बेटिंग अॅप घोटाळा (₹४०,००० कोटी), सुप्रीम कन्स्ट्रक्शन प्रा. लि. प्रकरण (४०० कोटी) पत्राचाळ घोटाळा (१०३९.७९ कोटी) यासह अनेक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांच्या फायली जळाल्याची माहिती आहे.