पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एक भीषण अपघाताची घटना घडली असून या अपघातात प्रवासी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या तरुणाला एसटी बसने धडक दिली होती. ज्यामुळे बस खाली आल्याने या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रवीण बालाजी कोका (वय 28, रा. हैद्राबाद, तेलंगणा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. तर याबाबत अमर चकराल (वय 44, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. तर एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण प्रवीण कोका हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ परिसरात खासगी कंपनीत कामगार होते. ते मोहोळ मध्येच वास्तव्यास होते. मात्र त्यांची आत्या पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहण्यास असल्याने ते दिवाळीनिमित्त आत्याला भेटायला पुण्यात आले होते. त्यावेळीस त्यांचा अपघात झाला.
शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास सोलापूर-पुणे बसने ते पुण्यात आले. त्यांची बस स्वारगेट एसटी स्थानकात पोहोचल्यानंतर ते बसमधून खाली उतरले. बस स्थानकातून बाहेर पडून त्यांना बिबवेवाडीकडे जायचे होते. मात्र स्वारगेट स्थानकाच्या प्रवेशद्वारावर एका एसटी बसने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत प्रवीण यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.