स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य मिळविण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी उद्योग, पत्रकारिता, साहित्य, कला आदि माध्यमांतून लाखो भारतीयांनी तसेच महिलांनी योगदान दिले आहे.
ते समाजापर्यंत पोहोचविण्याबरोबरच भारत सशक्त स्वावलंबी करण्याचा संकल्प रा.स्व. संघाने केला आहे. त्यासाठी सर्व सज्जनशक्ती एकवटून विविध संस्था संघटनांना सोबत घेण्याचे कार्य संपूर्ण देशभर रा.स्व. संघ करीत आहे, अशी माहिती रा.स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नुकतीच कर्णावती ( अहमदाबाद) येथे रा.स्व. संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा झाली त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेस प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव आणि पुणे महानगर कार्यवाह महेश करपे उपस्थित होते.
प्रांत संघचालक नानासाहेब जाधव पुढे म्हणाले की , कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असतानाच संघाचेही काम २०२० च्या तुलनेत जवळपास ९८ % ठिकाणी पूर्ववत सुरु झाले आहे. शाखांपैकी ६१ % शाखा विद्यार्थ्यांच्या तर ३९ % शाखा तरुण व्यावसायिकांच्या आहेत.