मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा मारला आहे. तसेच पुणे आणि रत्नागिरीमधील अनिल परब यांच्या मालकीच्या जागांचीही पाहणी केली जात आहे.
ईडी अधिकाऱ्यांचे पथक सीआरपीएफ जवानांचा फौजफाटा घेऊन अनिल परब यांच्या शिवालय या बंगल्यावर सकाळीच दाखल झाले. अनिल परब सध्या याचठिकाणी उपस्थित असल्याचे कळते. ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्यावर ईडीने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे. त्याशिवाय, ईडीने अनिल परब यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असल्याचे वृत्त आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्यावर ईडीने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी यापूर्वी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. सध्या हे दोघेजण कारागृहात आहेत. आता अनिल परब यांना देखील अटक होणार का याची उत्सुकता वाढली आहे.
अनिल परब यांच्या शिवालय या शासकीय निवासस्थानी दाखल झालेल्या ईडी अधिकाऱ्यांच्या पथकात सहाय्यक संचालक तासीन सुलतान यांचाही समावेश आहे. तासीन सुलतान हेच अनिल देशमुख प्रकरणातील तपासाधिकारी होते. देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गजाआड पाठवण्यात तासीन सुलतान यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे आता अनिल परब यांच्याविरोधात ईडी काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल.
‘बोजा बिस्तरा तयार ठेवा’
अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाईला सुरुवात करताच भाजप नेते किरीट सोमय्या याणी तात्काळ प्रतिक्रिया देत अनिल परब याना ‘बोजा बिस्तरा तयार ठेवा’
असा सल्ला दिला आहे. अनिल परब यांना अटक होण्याची दाट शक्यता आहे.