हॉस्पिटलमध्ये लिंबू-मिरची, काळी बाहुली आणि नातेवाईकांच्या सांगण्यावरून डॉक्टरांना मानसिक त्रास ? मनीषा मानेवर गंभीर आरोप

2759 0

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. डॉक्टरांनी चिठ्ठीत नाव दिलेल्या मनीषा माने या महिलेने हॉस्पिटलचा सर्व कारभार आपल्या हातात घेऊन मनमानी करायला सुरुवात केली होती. एवढंच काय तर हीच महिला वळसंकर यांच्या हॉस्पिटलमध्ये चक्क जादूटोण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. तर कुटुंबातीलच एका वयाने लहान असलेल्या नातेवाईकानं डॉक्टरांवर हात उचलल्याचं देखील बोललं जात आहे. या प्रकरणातील या नव्या अपडेट पाहूया..

मनीषा मुसळे माने, ही महिला वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रमुख प्रशासकीय अधिकारी होती. सुरुवातीला तिच्या चांगल्या कामामुळे डॉक्टरांनीच तिला या पदापर्यंत पोहोचवलं. डॉक्टर तिला आपल्या मानसकन्याप्रमाणे वागणूक द्यायचे. मात्र नंतर तिने सर्व कारभार हाती घेतला आणि मनमानी सुरू केली. ती हॉस्पिटल साठीच्या वस्तू खरेदी करताना आर्थिक गैरव्यवहार करायची, परस्पर भंगार विकायची. कुणी काही बोलल्यास थेट कामावरून काढून टाकायची. तिची ही सगळी मुजोरी डॉक्टरांच्या कानावर गेल्यानंतर डॉक्टर हैराण झाले होते. सध्या हॉस्पिटलचे प्रमुख म्हणून डॉक्टरांचा मुलगा आणि सून हे काम पाहत होते. मात्र मनीषा मुसळे च्या या गैरकारभारामुळे चिडलेल्या डॉक्टरांनी अखेर चार-पाच महिन्यांपासून सर्व कारभार आपल्या हाती घ्यायला सुरुवात केली होती. मात्र त्यामुळे या महिलेने हॉस्पिटलच्या आवारात जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा हॉस्पिटल मधीलच एका सेवकाने केला आहे. अमावास्येच्या दिवशी मनीषा ही ऑन ड्यूटीच अचानक रिक्षामधून कुठेतरी जायची. कुठे जायची हे माहित नाही पण येताना लिंबू, बिब्बा अन् काळ्या बाहुल्या घेऊन यायची. त्या हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ठेवायची. हॉस्पिटलमध्ये एक मशीन बसवतानाही तिने त्याखाली या वस्तू ठेवल्याचा दावा या सेवकाने केला आहे. एवढेच काय तर हा डॉक्टर सहा महिन्यात मरणार आहे त्यानंतर इथे मीच असणार आहे असा सज्जड दम ती तर कर्मचाऱ्यांना भरायची, असं सांगितलं जात आहे.

Mid anc
ज्या सेवकाने या महिलेवर एक गंभीर आरोप केले आहेत. त्याने अनेकदा डॉ. वळसंगकर यांनाही अनेकदा हे प्रकार सांगितले होते. मात्र डॉक्टर इतके हैराण झाले होते, की मला त्या बाईचं काही सांगू नकोस, तू निवांत बस आपण गप्पा मारू.. असं देखील ते या सेवकाला म्हटल्याचं त्याने सांगितलं. एकीकडे या महिलेवर इतके गंभीर आरोप केले जात असताना या महिलेला नेमकं बळ कोणी दिलं ? याचा शोध सुरू झाला आहे. त्याचबरोबर डॉक्टरांच्या कुटुंबातीलच व्यक्तींनी त्यांचं मानसिक खच्चीकरण केल्याचं देखील समोर आलं आहे.

डॉ. वळसंगकर यांच्या निकटवर्तीयाने याबाबतचे खुलासे केले आहेत. हॉस्पिटलचा सर्व कारभार त्यांचा मुलगा आणि सून पाहत होते. त्यांना आर्थिक व्यवहारातून दूर केलं गेलं होतं. त्याचबरोबर त्यांचा एका वयाने लहान असलेल्या नातेवाईकांकडून वारंवार डॉक्टरांचा अपमान केला जात होता. त्यांचं मानसिक खच्चीकरण केलं जात होतं. एवढेच काय तर या नातेवाईकानं डॉक्टरांवर दोन ते तीन वेळा हात देखील उचलला होता. अतिशय हुशार आणि मनाने हळव्या असलेल्या डॉक्टरांनी हा सगळा छळ शांतपणे सहन केला. विशेष म्हणजे मनीषा माने ही महिला देखील या नातेवाईकाच्या जवळची आहे. या नातेवाईकाच्या सांगण्यावरून ही महिला अशा पद्धतीने काम करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही महिला केवळ प्यादं असून या सगळ्याचा मास्टर माईंड डॉक्टरांच्या निकटवर्तींपैकीच कोणीतरी असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भातलेच मेसेज आणि ऑडिओ क्लिप या महिलेच्या मोबाईल मध्ये असून हा मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय. त्यामुळे खरंच या मोबाईल मध्ये असे कोणते पुरावे आहेत का ? याचा तपास सुरू आहे.

डॉ. वळसंगकर यांचं आत्महत्येच्या दोन दिवस आधी उद्योजक असलेल्या जवळच्या मित्राशी फोनवर बोलणं झालं होतं. त्यावेळी कुटुंबात सुरू असलेले तणाव, हॉस्पिटल मधील ताण, वारंवार अपमानित वातावरणात राहावं लागत असल्याचा उल्लेख डॉक्टरांनी केला होता, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या फोन मधूनच अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागणार आहेत. पोलिसांकडून अद्याप डॉक्टरांच्या फोनची फॉरेन्सिक तपासणी झालेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर ही तपासणी करून डॉक्टरांच्या आत्महत्येमागे नेमकं कारण काय याचा तपास लावण्याची मागणी होत आहे.

Share This News
error: Content is protected !!