वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांची प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून करण्यात आलेली निवड आणि उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर भविष्यात त्यांना परीक्षा देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पूजा खेडकर यांना हा सगळ्यात मोठा धक्का आज बसला आहे.
यूपीएससीची फसवणूक केल्या प्रकरणी पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे आणि आजच केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करत खेडकर यांच्यावर सगळ्यात मोठी कारवाई केली आहे.
पूजा खेडकर यांनी यूपीएससी ला बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले होते. त्याचबरोबर 40 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असून देखील त्यांनी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतला. ओबीसी आरक्षणासाठीचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देखील त्यांनी सादर केले होते. त्याचबरोबर नावात बदल करून यूपीएससी परीक्षा देण्याच्या संधी संपल्यानंतरही दोनदा यूपीएससीची परीक्षा दिली. त्यानंतर त्यांची निवड आयएएस पदी झाली होती. मात्र त्यांचा हा सगळा गैरकारभार उघड झाल्यानंतर आता यूपीएससीची फसवणूक केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आज यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे.