मुंबई (MUMBAI) महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलेला असतानाच ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत(SANJAY RAUT) यांच्या निवासस्थानी बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथक दाखल झाले आहे. यासोबतच मुंबई पोलिसांचाही मोठा ताफा घटनास्थळी पोहोचला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संजय राऊत(SANJAY RAUT) यांच्या घरासमोर उभी असलेली एक कार संशयास्पद आढळून आली. या कारवर ‘बॉम्ब से उडा दूंगा’ असा मजकूर असलेले स्टिकर लावलेले होते. ही माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे पथक आणि बॉम्बशोधक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. राऊत यांच्या घराची तसेच आजूबाजूच्या परिसराची सखोल तपासणी सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सध्या हे स्टिकर नेमके कोणी आणि कोणत्या उद्देशाने लावले, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, कोणताही धोका टाळण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तसेच स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.