खासदारकीचं तिकीट कापलं पण विधान परिषदेत मिळवला विजय, पाहा भावना गवळी यांचा राजकीय प्रवास

3783 0

महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकारणातलं प्रसिद्ध नाव आणि विदर्भातील शिंदेंच्या शिवसेनेच्या पावरफुल नेत्या म्हणजेच भावना गवळी… भावना गवळी यांचा विधान परिषद निवडणुकीत विजय झाला. तब्बल पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी या आता विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेल्यात. त्यामुळे भावना गवळी यांचा हा सर्व प्रवास नेमका कसा होता जाणून घेऊया…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विदर्भातील बुलंद तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भावना गवळी यांचा राजकारणात येण्याचा आणि आल्यानंतरचा प्रवास प्रचंड इंटरेस्टिंग आहे… भावना गवळी यांचा जन्म 23 मे 1974 रोजी वाशिम मध्ये झाला. माजी खासदार स्व. पुंडलिकराव गवळी यांच्या सर्वात लहान कन्या असलेल्या भावना यांना वडिलांकडूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. पुंडलिकराव गवळी यांना चार मुली होत्या. या चारही मुलींना त्यांनी प्रचंड प्रोत्साहन देत नेतृत्व गुणही दिले. भावना यांना बास्केट बॉल, टेनिस आणि स्विमींग या खेळांची आवड होती. पण वडिलांना पाहून भावना गवळी यांनाही लहानपणापासूनच राजकारणात येण्याची इच्छा होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भावना गवळी यांनी राजकारणात एन्ट्री केली आणि पुढे वडिलांच्या निधनानंतरही राजकारणातील कारकीर्द सुरू ठेवली. लहान वयातच राजकारणात प्रवेश केलेल्या भावना गवळी यांनी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला. आणि त्यानंतर कायमस्वरूपी साठी त्यांनी लोकसभेतील आपली सीट बुक करून ठेवली. कारण पुढे 2004, 2009, 2014 आणि 2019 असं सलग पाच वेळा त्या खासदार म्हणून निवडून आल्या. दांडगा जनसंपर्क आणि निर्भिड स्वभाव असल्यामुळे राजकारणातील अनेक आव्हान त्यांनी पेलली. मात्र या सगळ्यात राजकारणात आल्यापासून आपल्याला आपल्या कुटुंबीयांसाठी खेळासाठी, आवडीनिवडींसाठी वेळ देता येत नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली होती. सगळं काही सुरळीत चालू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. आणि या बंडात गवळी यांनीही शिंदेंचं नेतृत्व स्वीकारलं. यानंतर मात्र 2024 लोकसभेत भावना गवळी यांचा पत्ता कट झाला. पाच वेळच्या खासदार असूनही तिकीट मिळालं नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. मात्र त्याही वेळी खचून न जाता भावना गवळी यांनी पुढच्या संधीची वाट पाहिली. आणि अखेर शिंदेंच्या शिवसेनेतर्फे विधान परिषदेसाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आणि अगदी सहज त्यांनी विजय मिळवला. विजयासाठी हवं असलेल्या 23 मतांपेक्षा एक मत त्यांना जास्तच मिळालं.

पाच वेळच्या खासदार असलेल्या भावना गवळींचं आमदार म्हणून डिमोशन झालं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मात्र विधान परिषदेच्या निमित्ताने त्यांचं पुनर्वसन झालं, हे शिवसेना शिंदे गटाच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे.

Share This News
error: Content is protected !!