राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून राज्याचे माजी राज्यमंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर आज गोळीबार करण्यात आला होता या गोळीबारात बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झालाय.
गोळीबारात बाबा सिद्दिकी यांच्या छातीला गोळी लागली होती. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आणि वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेरच हा गोळीबार झाला आहे. बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यानंतर त्यांना राज्य सरकारने वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर गोळीबार झाला आहे. या गोळीबारानंतर दोन जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे
कोण होते बाबा सिद्दिकी?
- बाबा सिद्दिकी हे राजकारणी तर होतेच मात्र बॉलीवूडमध्येही त्यांचं कनेक्शन होतं
- बाबा सिद्दिकी यांची इफ्तार पार्टी नेहमी चर्चेचा विषय राहिली आहे
- बाबा सिद्दिकी हे 1992 आणि 1997 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
- 1999, 2004 आणि 2009 मध्ये बाबा सिद्दिकी हे वांद्रे पश्चिम मतदार संघातून आमदार म्हणून विजयी झाले.
- विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळामध्ये 2004 ते 2008 या कार्यकाळात सिद्दिकी यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री म्हणून बाबा सिद्दिकी यांनी काम पाहिलं
- काही दिवसांपूर्वीच म्हणजे 10 फेब्रुवारी 2024 रोजी बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता.