संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर राजीनामा देण्याच्या मागणीने जोर पकडला असतानाच आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना तब्बल २४५ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला.
या आरोपांना धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिला मात्र त्यानंतर पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केल्यानंतर आता धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर आले असून अंजली दमानिया यांच्यावर अब्रू नुकसानीच दावा दाखल करण्याचा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
धनंजय मुंडे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरु झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.