पुण्याला पुन्हा अलर्ट ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्यापासून बरसणार मुसळधार पाऊस
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर गेले दोन दिवस पावसाने दांडी मारली होती. मात्र संपूर्ण राज्यभरातच उद्यापासून पुन्हा पावसाची बॅटिंग पाहायला मिळणार आहे. तसा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
राज्यातील पुढचे चार ते पाच दिवस पावसाचे असणार आहेत. पुढील दोन-तीन दिवसांसाठी कोकण विभागाला अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. तर पुण्यातील घाटमाथ्यांवरदेखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याकारणाने पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह सातारा, कोल्हापूर मध्ये देखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सगळीकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस
देशात यंदाच्या वर्षी 106% पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागात सरासरीपेक्षा 41 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर मध्य महाराष्ट्रात 45 टक्के जास्त पाऊस पडल्याची नोंद आहे. मराठवाड्यात 27% जास्त पाऊस पडला असून विदर्भात 36 टक्के जास्त पाऊस पडला आहे. तर महाराष्ट्रात केवळ जुलै महिन्यामध्ये 138 टक्के जास्त पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.