महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवणाऱ्या घटनेत मंत्री नरहरी झिरवळ (NARHARI ZIRWAL)यांच्या मंत्रालयातील कार्यालयात 35 हजार रुपयांची लाच घेताना एका लिपीकाला एसबी पथकाने रंगेहात पकडले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला कोठडी सुनावली आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागातील कर्मचारी राजेंद्र ढेरंगे (RAJENDRA DHERANGE) क्लार्क याने एका मेडिकलचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी 50 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यातील 35 हजार रुपये स्वीकारताना एसबीने त्याला पकडले.
या घटनेनंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली आहे, कारण ही कारवाई थेट मंत्र्यांच्या दालनात झाली. तपासादरम्यान अटक करण्यात आलेल्या लिपीकाने मंत्री झिरवळ यांच्या खासगी पीएने पैसे स्वीकारण्यास सांगितल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्री नरहरी झिरवळ (NARHARI ZIRWAL) यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. “माझा संबंध सिद्ध झाला तर मी तत्काळ राजीनामा देईन,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रकरण उघड झाल्यानंतर आज सकाळपासून मंत्र्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. खासगी सचिवाचे नाव समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा अधिकच रंगली आहे.