महंत रामगिरी महाराज यांनी काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबर आणि मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. या प्रकरणी त्यांच्याविरोधात आता पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य करत दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अॅड. तौसिफ चाँद शेख (वय ३२, रा. एन आय बी एम रोड, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महंत रामगिरी महाराज (रा. सदगुरु श्री गंगागिरी महाराज संस्थान, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करुन त्याचे चित्रिकरण
केले व जाणीवपूर्वकरीत्या समाजात तेढ निर्माण करण्याच्या हेतूने ते प्रसारित देखील केले. त्यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला धक्का पोहोचला आहे. मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशी तक्रार नोंद करण्यात आली असून कोंढवा पोलिसांनी भारतीय न्याय दंडसंहिता २०२३ कलम १९२, १९६,१९७, २९९, ३०२, ३५३ (२), ३५६(२), ३५६(३) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.