महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र अद्यापही प्रमुख पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. पुण्यामध्ये भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना युतीने लढणार असल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. मात्र जागा वाटपावरून तिढा निर्माण झाल्याचं दिसून आलं. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेत आम्हाला सन्मान जनक जागा मिळायला हव्या, अशी मागणी केली. आत भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. पुढील काही तासांत या युतीची आणि दोन्ही पक्षांमधील जागा वाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
भाजपचे उमेदवार ठरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शहरातील सर्व प्रमुख नेत्यांची मॅरेथॉन बैठक पार पडली. यानंतर पुण्याची जबाबदारी असणारे उद्योग मंत्री उदय सामंत व शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी वर्षात निवासस्थानी जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत युती संदर्भात चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी नुकतेच एक फोटो पोस्ट केला असून यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री उदय सामंत आणि स्वतः गणेश बिडकर यांची उपस्थिती दिसून आली. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री सामंत यांनी पुण्यातील संभाव्य युतीला मूर्त स्वरुप दिल्याची माहिती आहे.
गुरुवारी दुपारी आमदार नीलम गोऱ्हे यांची भेट घेतल्यानंतर गणेश बिडकर मुंबईकडे रवाना झाले. या घडामोडीनंतर पुण्यासाठी भाजप–शिवसेना युतीबाबतची अंतिम चर्चा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाल्याची माहिती आहे. युतीचा नेमका फॉर्म्युला काय असणार, कोणत्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अवघ्या काही तासांतच युतीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील 62 उमेदवारांची पहिली यादीही तयार झाली आहे. शुक्रवारी रात्रीपर्यंत ही यादी जाहीर होणार आहे. भाजपने (BJP) मागील महापालिका निवडणुकीमध्ये ज्या 99 जागा जिंकल्या होत्या त्यातील 62 जागांची ही यादी असणार आहे.