satara soldier death

साताऱ्यात मन हेलावणारी घटना; पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा मृत्यू

149 0

साताऱ्यातून (SATARA) मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टीवर गावी आलेल्या भारतीय सैन्यातील जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे. साताऱ्यातील दरे येथील वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांचे अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे .

प्रमोद जाधव(PRAMOD JADHAV) हे भारतीय सैन्यात सिकंदराबाद श्रीनगर येथे कार्यरत होते. आई नसल्याने पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते. मात्र काही कामानिमित्त दुचाकीवरून वाढे फाट्याच्या दिशेने जात असताना पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रमोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच दरे गावासह परळी खोऱ्यात शोककळा पसरली. दुर्दैवाची बाब म्हणजे, प्रमोद यांच्या निधनानंतर काही वेळातच त्यांच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला.

आज सकाळी प्रमोद जाधव(PRAMOD JADHAV) यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. अंत्यविधीच्या वेळी त्यांच्या पत्नीला आणि नवजात बाळाला अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. स्ट्रेचरवर असलेल्या पत्नीच्या हाताला सलाईन लावलेले होते. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टीवर आलेल्या प्रमोद जाधव यांना आपल्या लेकीचा चेहरा पाहता आला नाही, ही भावना अनेकांना अस्वस्थ करून गेली.

यानंतर शासकीय इतमामात वीर जवान प्रमोद जाधव(PRAMODH JADHAV)  यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या वीर जवानाला अखेरचा निरोप दिला .

Share This News
error: Content is protected !!