महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. मतदानाला अवघे सात दिवस शिल्लक असल्याने सर्वच पक्ष जोरदार प्रचारात उतरले आहेत. आरोप-प्रत्यारोप, प्रचारसभा आणि प्रचार साहित्यामुळे निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत (BMC) भाजपला(BJP)एक धक्का बसला आहे.
मुंबई महापालिकेसाठी भाजपने(BJP) तयार केलेल्या प्रचार गीताला राज्य निवडणूक आयोगाने परवानगी नाकारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या गीतामध्ये ‘भगवा’ या शब्दाचा वापर करण्यात आला होता. मात्र निवडणूक आचारसंहितेनुसार धार्मिक भावना किंवा विशिष्ट रंगांचा राजकीय प्रचारात वापर करण्यावर कडक निर्बंध आहेत. त्यामुळे या शब्दप्रयोगावर आयोगाने आक्षेप नोंदवला असून, हे गीत आचारसंहितेच्या निकषांमध्ये बसत नसल्याचे स्पष्ट केले आहे. परिणामी, हे प्रचार गीत अधिकृतपणे वापरण्यास आयोगाने नकार दिला.
विशेष म्हणजे, हे प्रचार गीत भव्य स्वरूपात तयार करण्यात आले होते. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते(AVADUT GUPTE) आणि वैशाली सामंत(VAISHALI SAMANT)यांच्या आवाजात हे गीत ध्वनिमुद्रित करण्यात आले होते. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात या गीताच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची भाजपची योजना होती. मात्र ऐनवेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे भाजपच्या प्रचार रणनितीला धक्का बसल्याचे चित्र आहे.