आगीमध्ये घर जळालेल्या गरीब महिलेला गावकऱ्यांनी दिली 35 हजार रुपयांची आर्थिक मदत

506 0

पुणे- गावकऱ्यांची एकजूट काय असते याचे उत्तम उदाहरण भोर तालुक्यातील म्हाळवडी गावातील लोकांनी दाखवून दिले आहे. शॉर्टसर्किटमुळे एका गरीब महिलेचे घर आगीमध्ये जळून गेले. या महिलेला पुन्हा घर उभे करण्यासाठी ग्रामस्थांनी वर्गणी काढून या महिलेसाठी तब्बल २९ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. ग्रामस्थांच्या या कृतीचे पंचक्रोशीमध्ये कौतुक होत आहे.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील म्हाळवडी गावात राहणाऱ्या शारदा शिवाजी पांगारकर यांच्या घराला सकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमध्ये त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. शारदा पांगारकर या परिस्थितीने गरीब असून त्यांना पुन्हा घर उभे करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज होती.

ही गरज ओळखून म्हाळवडी गावातील ग्रामस्थांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. त्यासाठी उमेश बोडके यांचा गुगल पे नंबर देण्यात आला. त्याचप्रमाणे रोखीच्या स्वरूपात मदत करणाऱ्यांनी सरपंच दत्तात्रय भिकू बोडके यांच्याकडे जमा करावी असे जाहीर करण्यात आले. ग्रामस्थांनी या आवाहनाला प्रतिसाद देत म्हाळवडी, कर्णवडी व बारे बुद्रुक गावातील नागरिकांनी तब्बल 35 हजार रुपयांची आर्थिक मदत जमा केली.

ही मदत म्हाळवडी येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात पांगारकर कुटूंबियांना सुपूर्द करण्यात आली. या मदतीबद्दल पांगारकर कुटुंबीयांनी ग्रामस्थांचे आभार मानले. ग्रामस्थांच्या या मदतीमुळे एका कुटुंबाला जगण्याची उभारी मिळाली अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या या कृतीचे पंचक्रोशीमध्ये कौतुक होत आहे.

Share This News
error: Content is protected !!