पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द झाल्याचे काल जाहीर करण्यात आले होते. मात्र आता राज ठाकरे यांची पुण्यातील सभा या आठवड्याच्या शेवटी २२ मे रोजी गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे सकाळी १० वाजता होणार आहे अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना उद्देशून केलेल्या वक्तव्याला राज ठाकरे उत्तर देणार का यांची उत्सुकता आहे.
राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. या सभेबाबात राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्यासोबत बैठक घेतली. बाळा नांदगावकर म्हणाले की, नदीपात्रात सभा होणार असल्याचं निश्चित झालं होतं. हवामान खात्याचा अंदाज पाहता पाऊस कधीही येऊ शकतो. अशा परिस्थितीत अचानक पाऊस आला तर हजारो लोकांना त्रास होईल. यामुळे 21 ऐवजी 22 मे रोजी गणेश कला क्रीडा मंच इथे सकाळी दहा वाजता सभा घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. राज ठाकरे यांना बऱ्याच विषयांवर बोलायचं आहे, त्यामुळे त्यांनी ही सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे.”
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन आठवड्यापूर्वी नाशिकच्या सभेत राज ठाकरे यांना दिवसा सभा घेण्याच आव्हान दिले होते. दादा म्हणाले होते की, आम्ही सकाळी, दुपारी सभा घेतो. यांनी कधी दूपारी सभा घेतली का ? कधी कष्ट घेतले आहेत का? यांची सभा कधी संध्याकाळी. उगीच लोकांची दिशाभूल करायची, हे तुमच्या माझ्या महाराष्ट्राला परवडणारे नाही. राजकीय स्वार्थापोटी समाजामध्ये फूट पाडण्याचे काम सुरु आहे. चांगले वातावरण गढूळ करण्याचे काम काही लोकांकडून केले जात आहे’, असे अजित पवार म्हणाले होते.
आता अजित पवार यांच्या वक्तव्याचा राज ठाकरे कशा प्रकारे समाचार घेणार हे पाहावे लागेल. दरम्यान, अजित पवार यांचे हे आव्हान राज ठाकरे यांनी स्वीकारले आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.