Breaking News ! नवज्योत सिंह सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा

415 0

नवी दिल्ली- नवज्योत सिंह सिद्धू यांना 34 वर्ष जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सन 1988 मध्ये झालेल्या एका पार्किंगच्या वादातून सिद्धू यांनी एका ६५ वर्षीय वृद्धाला मारहाण केली होती. त्यानंतर उपचारा दरम्यान त्या वृद्धाचा मृत्यू झाला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवज्योत सिंह सिद्धू यांना मोठा झटका मिळाला आहे.

यापूर्वी या प्रकरणी नवज्योत सिंह सिद्धू यांना उच्च न्यायालयाकडून शिक्षा मिळाली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांचा हत्या करण्याचा उद्देश नव्हता असे सांगत सर्व आरोप फेटाळून त्यांची सुटका केली होती. मात्र, दोन वर्षांनी पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आज निकाल लागला आहे. सुप्रीम कोर्टाने सिद्धू यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

काय आहे प्रकरण ?

27 डिसेंबर 1988 च्या संध्याकाळी सिद्धू हे त्यांचे मित्र रुपिंदर सिंग संधूसोबत पटियालाच्या शेरावले गेटच्या बाजारात पोहोचले होते. हे ठिकाण त्यांच्या घरापासून 1.5 किमी अंतरावर आहे. तेव्हा सिद्धू क्रिकेटपटू होता. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू होऊन फक्त एक वर्ष झाले होते. त्याच मार्केटमध्ये कार पार्किंगवरून 65 वर्षीय गुरनाम सिंग यांच्याशी त्यांचा वाद झाला. प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. सिद्धू यांनी गुरनाम सिंगला पाडले. त्यानंतर गुरनाम सिंग यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. गुरनाम सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त समोर आले होते.

त्याच दिवशी सिद्धू आणि त्यांचा मित्र रुपिंदर यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सत्र न्यायालयात खटला चालला. वर्ष 1999 मध्ये सत्र न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला. वर्ष 2002 मध्ये पंजाब सरकारने सिद्धूविरोधात उच्च न्यायालयात अपील केले होते. दरम्यान 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर अमृतसर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते.
उच्च न्यायालयाने डिसेंबर 2006 मध्ये निकाल सुनावला. यामध्ये उच्च न्यायालयाने सिद्धू आणि संधूला दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. सिद्धू यांनी त्यानंतर लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांनी सिद्धूच्यावतीने खटला लढवला होता. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. सन 2007 मध्ये सिद्धू पुन्हा अमृतसरमधून निवडणूक जिंकले.

त्यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. त्याचा आज निकाल लागून सिद्धू यांना एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!