मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंच्या भाषणावर नाराजी व्यक्त करणाऱ्या शाम देशपांडेंची शिवसेनेतून हकालपट्टी
पुणे- पुण्यातील शिवसेनेचे नेते शाम देशपांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत शिवसेनेचे काम थांबवत असल्याचे म्हटले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील भाषणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली होती. भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी शाम देशपांडे यांनी जाहीरपणे पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना-भाजपा युती तुटल्याने अनेक शिवसैनिकांना दु:ख होत आहे. त्यात उद्धव ठाकरे यांनी संघावर टीका केल्याने क्लेश होत आहे.
भाजपाच्या पूर्वीही संघ होता. संघाला राजकारणात ओढण्याची गरज नव्हती असं माझं प्रामाणिक मत आहे. संघाला राजकारणात ओढून उद्धव ठाकरेंनी बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्याचा पदर घट्ट धरला आहे अशीच माझी भावना आहे. संघाच्या हिंदुत्वाला आक्रमकतेची योग्य दिशा हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिली. आज आरएसएसवर टीका करून ती दिशा भरकटली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वादात ओढून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची री ओढली आहे. त्यामुळे आजपासून मी शिवसेना पक्षाचे काम थांबवत असल्याचे शाम देशपांडे यांनी पत्रकात म्हटले होते. या पत्रकानंतर शिवसेनेकडून देशपांडे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
कोण आहेत शाम देशपांडे ?
शाम देशपांडे हा १९७२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. नंतरच्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. देशपांडे हे पुणे महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक होते. शाम देशपांडे (Sham Deshpande) शिवसेनेकडून कोथरूडमधून निवडून आले होते. ते २०००-२०१२ या कालावधीत नगरसेवक होते तर २००८-०९ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी बराच काळ शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
