सहा कोटी रुपयांची वीज चोरी, बापलेक असे करायचे विजेची चोरी

643 0

ठाणे- तब्बल सहा कोटी रुपयांची वीज चोरी करणाऱ्या पितापुत्राच्या विरोधात मुरबाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या बापलेकाने गेल्या 29 महिन्यांत 5.93 कोटी रुपयांची एकूण 34 लाख युनिट्सपेक्षा जास्त वीजचोरी केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

चंद्रकांत भांबरे आणि त्यांचा मुलगा सचिन भांबरे अशी गुन्हा दाखल झालेल्या बापलेकाची नावे आहेत.

मुरबाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या पथकाने 5 मे रोजी फाळेगाव येथील एका दगडी क्रशिंग युनिटवर छापा टाकला होता. कंपनीच्या वीज मीटरची तपासणी केली असता मीटरमध्ये फेरफार केल्याचे प्राथमिक तपासामध्ये आढळून आले. तसेच वीज वापराच्या नोंदी संशयास्पद असल्याचे आढळून आले. त्यानंतर प्रयोगशाळेत मीटर तपासले असता रिमोट कंट्रोल सर्किट लावून क्रशर ऑपरेटरने गेल्या 29 महिन्यांत 34 लाख युनिटहून अधिक वीज चोरी केल्याचे तपासात उघड झाले.

रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने हे सर्किट नियंत्रित केल्यास क्रशरचा प्रत्यक्ष वीजवापर मीटरमध्ये कमी नोंदविला जातो, असे आढळून आले. अशाप्रकारे डिसेंबर 2019 ते एप्रिल 2022 या कालावधीत पिता-पुत्रांनी मिळून कोट्यवधी रुपयांची वीजचोरी केली. आरोपीविरुद्ध विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!