शरद पवारांवरील केतकी चितळेची पोस्ट वादाच्या भोवऱ्यात ; केतकीच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल

589 0

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणे अभिनेत्री केतकी चितळेला महागात पडलं आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एकूणच या प्रकारामुळे केतकी चितळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

शरद पवार यांच्यावर ऍड नितीन भावे यांनी रचलेली एक कविता केतकी चितळे हिने आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे. या कवितेमध्ये अत्यंत खालच्या भाषेमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

केतकी चितळेनं केलेल्या या पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. केतकी चितळेनं ही पोस्ट केल्यामुळं पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. फेसबुकवर केतकीने केलेल्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असून हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

स्वप्नील नेटके यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की केतकीनं ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं आहे. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनं केली आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी केतकीविरोधात कलम ५०५(२), ५००,५०१, १५३ ए नुसार कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतकी चितळे ही तिच्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यामुळं नेहमी चर्चेत असते. मध्यंतरी केतकी चितळे हिने छत्रपती शिवरायांवरील केलेली पोस्ट देखील चर्चेत आली होती. अनेकदा ती राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर सोशल मीडियावरुन तिचं मत मांडत असते. त्यामुळं अनेकदा ती सोशल मीडियावर ट्रोलही होत असते.

दरम्यान, ट्विटरवर शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निखील भामरे या ट्विटर युजर विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांची तक्रार दाखल केली होती. आनंद परांजपे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निखील भामरे या व्यक्तिने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला आहे. “वेळ आली आहे बारामतीच्या “गांधी”साठी… बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटनुसार शरद पवार यांना मारण्याचा आणि समाजात अशांतता निर्माण करण्याचा उद्देश असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार धमकी तसेच चिथावणी दिल्याप्रकरणी हा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

केतकी चितळेंची ती पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/epilepsy.warrior.queen/posts/10166554560880051

Share This News
error: Content is protected !!