जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हजारोंच्या उपस्थितीत भावनिक आणि प्रेरणादायी भाषण केले. ऐतिहासिक शिवनेरीच्या पावन भूमीवर बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाचा कठीण काळ आठवला आणि त्या क्षणी त्यांच्या मनात राजमाता जिजाऊंची प्रतिमा उभी राहिल्याचे सांगितले.
अजित पवार यांनी आयुष्यभर जपलेली फुले शाहू आंबेडकर विचारधारा मी कधीही सोडणार नाही. त्या विचारांवरच माझी वाटचाल सुरू राहील, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, शिवनेरी किल्ल्याशी अजित पवार यांचे विशेष नाते होते. या ठिकाणी त्यांनी अनेकदा जनतेशी संवाद साधला असून किल्ल्याच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी सातत्याने प्रयत्न केले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी भरलेल्या भव्य मेळाव्यात शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.