धक्कादायक ! आई वडिलांनी पोटच्या मुलाला डांबून ठेवले, ते सुद्धा २२ कुत्र्यांच्या सोबत
पुणे- पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आईवडिलांना आपले मूल म्हणजे जीव की प्राण असते. पण या जगात असेही आईवडील असतात ते पोटच्या मुलावर अन्वनित अत्याचार करतात. अशाच एका आईबापांनी आपल्या ११ वर्षाच्या मुलाला दोन वर्ष डांबून ठेवले. ते सुद्धा एकटे नाही तर त्याच्यासोबत होती २२ कुत्री. पीडित मुलाच्या आईवडिलांच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी बाल संगोपन आणि संरक्षण न्याय कायद्यातल्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी की, कोंढवा परिसरात असलेल्या कृष्णाई बिल्डिंगमध्ये ११ वर्षाच्या मुलाला आई – वडिलांनी २ वर्ष डांबून ठेवले होते. ही गोष्ट सोसायटीतील एका जागरूक रहिवाशाच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी चाइल्डलाइन फाउंडेशनला कॉल केला. फाउंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ४ मे रोजी अपार्टमेंटला भेट दिली. या सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलाच्या आई-वडिलांची चांगलीच कानउघडणी केली. मात्र कारवाई न करता निघून गेले.
दुसऱ्या दिवशी मुलाची प्रकृती पाहण्यासाठी पुन्हा संबंधित अधिकारी घरी गेले असता, घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. त्यांनी खिडकीतून आतमध्ये पाहिले तेव्हा तो लहान मुलगा कुत्र्यांच्या कळपामध्ये एकटाच बसल्याचे दिसले. त्यानंतर बालकल्याण समितीला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आईवडिलांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ज्ञानदेवी चाइल्डलाइनच्या संचालिका अनुराधा सहस्रबुद्धे यांनी सांगितले की, ‘ घरातून रेस्क्यू केलेले मूल कुत्र्यासारखे वागत असल्याचे पाहून आम्हाला धक्का बसला. कित्येक दिवसांपासून योग्य पोषण न मिळाल्याने तो मुलगा अशक्त झाला आहे आणि त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे, अशी माहिती अनुराधा सहस्र्बुद्धे यांनी दिली.
