वकील गुणरत्न सदावर्ते यांनी स्थापन केली संघटना; निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ?

418 0

मुंबई- एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी नवी संघटना स्थापन केली असून या संघटनेचे एसटी कर्मचारी जनसंघ असं नाव देण्यात आलं आहे. या संघटनेच्या माध्यमातून एसटी महामंडळ बँकेच्या निवडणुकीत ते स्वत:चं पॅनेल उभा करणार असल्याची माहिती आहे. या संघटनेच्या माध्यमातून एसटी विलीनीकरणाचा लढा पुढे चालू ठेवणार असल्याचा इशारा देखील सदावर्ते यांनी दिला आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना नंतर इतर जुन्या गुन्ह्यांतही अटक करण्यात आली. त्यामुळे सदावर्ते हे तब्बल १८ दिवस तुरुंगात होते. अखेर कोर्टाने जामीन मंजूर केल्याने तुरुंगातून बाहेर पडलेल्या सदावर्ते यांनी आता निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं, अशी मागणी करत संप पुकारला. या संपातही सदावर्तेंनी उडी घेत आंदोलनाचं नेतृत्व केलं. या आंदोलनादरम्यान सदावर्तेंनी केलेली विविध वक्तव्ये चर्चेचा विषय ठरली. विलीनीकरणाची आशा मावळल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आक्रमक आंदोलन केलं. या हिंसक आंदोलनाचा कट वकील सदावर्ते यांनीच रचल्याचं सांगत पोलिसांकडून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide