खोपोली-मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात आज (9 मे) सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरुन भरधाव येणाऱ्या केमिकल टँकरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
तिघांपैकी दोघांची ओळख पटली असून सागर जनार्धन देशपांडे, योगेश बी सिंह अशी त्यांची नावे आहेत.
आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रोपेलीन गॅस वाहून नेणारा टँकर पुण्याच्या दिशेने निघाला होता. याचवेळी, बोरघाटातील खोपोली एक्झिटनजीक गॅस टँकरवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो उलटला. यावेळी, गॅस टँकरने पलिकडच्या लेनमध्ये मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील दोन गाड्यांना धडक दिली. यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला.
सुदैवाने टँकरमधील गॅसची गळती झाली नाही. खबरदारी म्हणून खोपोली अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात गॅस टँकरचा चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुणे येथे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. महामार्गावरील दोन कार या क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आल्या. या अपघातमुळे मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. 2 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.