manoj jarange

माझ्या हत्येचा कट रचला जातोय; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा गंभीर आरोप

2056 0

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे (MANOJ JARANGE) पाटील पुन्हा सक्रिय झाले असून पंढरपूर येथील कार्यक्रमात त्यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सडेतोड भूमिका मांडत आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला.

मी मराठा आरक्षणासाठी लढतोय म्हणून माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. माझ्याविरोधात सुपाऱ्या दिल्या जात आहेत, असा दावा जरांगे यांनी केला. मात्र, मायबाप जनता माझ्यासोबत आहे, त्यामुळे मला भीती नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

सरकारवर अप्रत्यक्ष टीका करत ते म्हणाले, “काही जण सांगतात की आता कोणी माझ्यासोबत नाही. पण एकाच गावात येऊन पाहा, समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत, सरकारी नोकऱ्या मिळवत आहेत. मी त्यांच्यासाठी लढलो, त्यामुळे समाज माझ्या पाठीशी राहणारच.

गरिबांसाठी काम करण्याचा पुनरुच्चार करत जरांगे म्हणाले की, समाजाच्या नावावर स्वतःचे हित साधणाऱ्यांना मोठं करण्याची गरज नाही. मला गोरगरीबांच्या मुलांना मोठं करायचं आहे.

तरुणांना त्यांनी व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आणि “आरक्षणाचा लाभ घ्या, त्यात लाज बाळगू नका,” असे आवाहन केले. दोन वर्षांत ५८ लाख नोंदी सादर केल्याचा उल्लेख करत सातारा संस्थानाचा आदेश लवकरच निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, यापूर्वी बीड (BEED) जिल्ह्यात जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली होती. अडीच कोटी रुपयांत ही सुपारी देण्याचा कट आखण्यात आल्याचा आरोप आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी बीडमधून दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. हा कट बीड जिल्ह्यातील एका बैठकीत रचल्याची माहिती असून, बैठकीत उपस्थित असलेल्या एका समर्थकाने ही बाब जरांगे यांना कळवल्याचे सांगितले जाते.

पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत गेवराई येथून दोन संशयितांना तातडीने ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.