पुणे एक्स्प्रेस वेवरील(PUNE EXPRESSWAY) आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी ३ फेब्रुवारी सायंकाळी गॅस टँकर(GAS TANKER) पलटी झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अपघाताला १६ तासांहून अधिक काळ लोटूनही टँकरमधील गॅस गळती पूर्णपणे थांबलेली नसून, घटनास्थळी अग्निशमन दल, बचाव व मदत पथके तसेच NDRF ची टीम तैनात आहे.
मंगळवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता पुण्याहून मुंबईच्या (PUNE MUMBAI) दिशेने जाणारा अवजड टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने आडोशी बोगद्याच्या वळणावर पलटी झाला. या टँकरमध्ये अत्यंत ज्वलनशील प्रोपोलिन गॅस होता. अपघातानंतर तातडीने गॅस गळती सुरू झाली. संभाव्य धोका लक्षात घेऊन महामार्ग पोलिसांनी दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ थांबवली आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
गळती होत असलेला गॅस ज्वालाग्रही असल्याने कोणतीही ठिणगी मोठा अपघात घडवू शकते. त्यामुळे केमिकल एक्सपर्टचे विशेष पथक अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने गॅस गळती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहे. टँकर सुरक्षितरित्या बाजूला केल्यानंतरच रस्ता पूर्णपणे खुला केला जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, एक्स्प्रेस वेवरील(EXPRESSWAY) वाहतूक अद्याप विस्कळीतच आहे. सध्या केवळ एक लाइन संथ गतीने सुरू करण्यात आली असून सर्व अवजड वाहनांना सुरक्षित अंतरावर थांबवण्यात आले आहे. यामुळे महामार्गावर किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हलकी वाहने आणि प्रवासी बसेस जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरून NH-48 बोरघाट मार्गे वळवण्यात आल्या असून, त्या मार्गावरही वाहतुकीचा ताण वाढला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, गॅस गळती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत एक्स्प्रेस वेवरील प्रवास टाळावा, अत्यावश्यक असल्यास जुन्या महामार्गाचा वापर करावा किंवा प्रवास पुढे ढकलावा, असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथकाने केले आहे.