अजित पवार(AJIT PAWAR) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी काटेवाडीहून बारामतीकडे(BARAMATI) जाणारी अंतिम यात्रा आज भावनिक वातावरणात सुरू झाली. विमान अपघातात झालेल्या त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. जन्मगाव असलेल्या काटेवाडीत हजारो नागरिक, नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
पवार कुटुंबीयांसह, भगिनी सुमित्रा पवार (SUNETRA PAWAR)यांच्या उपस्थितीत ही अत्यंत वेदनादायी यात्रा सुरू झाली. यावेळी “दादा परत या”, “एकच वादा अजित दादा”, “अमर रहे अजित दादा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांच्या अश्रूंमधून आणि घोषणांमधून अजित पवारांवरील प्रेम आणि आपुलकी स्पष्टपणे दिसून येत होती. कधी विजयाच्या मिरवणुकांनी गजबजलेले रस्ते आज मात्र निरोपाच्या शांत, गंभीर वातावरणाने भरले होते.
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. यासाठी राज्य व देशातील अनेक दिग्गज नेते बारामतीत दाखल झाले असून, त्यामध्ये राज ठाकरे, नितीन गडकरी, पंकजा मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करत पवार कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली आहे. लाखो कार्यकर्ते आणि समर्थक आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत जमले असून, संपूर्ण परिसर शोकाकुल वातावरणाने व्यापलेला आहे.